शुक्रवार दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी जयवंत दळवी जन्मशताब्दी प्रित्यर्थ सृजन गोवा आणि कला व संस्कृती संचालनालाय, गोवा सरकार तर्फे “जयवंत दळवी दर्शन -एक इंद्रधनुषी महोत्सव ” ह्या कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा राजीव कलामंदिर, फोंडा गोवा येथे साहित्य आणि कला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. जेष्ठ नाट्यकर्मी श्री सुरेश खरे, प्रमुख वक्ते आणि जयवंत दळवी यांचे सुपुत्र, श्री गिरीश दळवी, विशेष अतिथी म्हणून लाभले होते.
उदघाटन समारंभानंतर कालिका थिएटर्स, कळंगुट गोवा संस्थेला जयवंत दळवी यांचे अजरामर “ब्यॅरिस्टर ” नाटक दिग्गज जेष्ठ नाट्यकलाकार श्री सुरेश खरे जी आणि जयवंत दळवी ह्यांचे सुपुत्र श्री गिरीश दळवीजींच्या उपस्थितीत सादर करण्याची सुवर्ण संधी मिळाली. सर्वात महत्वाचे म्हणजे थोर नाट्य लेखक आणि साहित्यक जयवंत दळवी यांचा जन्म शताब्दी महोत्सव, जो महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात साजरा होत आहे. आणि त्यांनीच लिहिलेल्या अजरामर नाटकापैकी “बॅरिस्टर ” हे लोकप्रिय नाटक. नाट्यप्रयोग अप्रतिम झाला. नाटकाचे कथानक अतिशय सुंदर आहे. श्री पुष्पशील नागवेंकर यांनी बॅरिस्टर ची भूमिका उत्कृष्टपणे सादर केली. रंगभूमीचा वापर कसा करावा हे दिग्दर्शक ठरवत असतात. ह्या नाटकाचे ते स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी बारीक सारीक गोष्टींवर भरपूर लक्ष्य केंद्रीत करून अभिनयाबरोबर एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सिद्ध केलं.

नाटकाची सुरवात पण छान झाली. सर्व कलाकारांनी अगदी जीव ओतून आपली अदाकरी सादर केली. सर्व कलाकार आप आपल्या परीने भूमिकेला न्याय देण्यास यशस्वी ठरले. पुष्पशील नागवेंकर (बॅरिस्टर “रावसाहेब “), सौ. निवेदिता चंद्रोजी (मावशीबाई ), आदित्य नागवेंकर (भाऊराव ), कु. नूतन रेवडकर (राधाक्का ), श्याम नागवेंकर (नानासाहेब ), विनायक नागवेंकर (तात्या ), विवेकानंद नार्वेकर (गणोजी ), विनोद साळकर (शांतू न्हावी ), अवनीश नागवेंकर (पम्पूशेट ) आणि सौ. प्रीतम प्रभू पै (ग्लोरिया ) हया सर्वांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. नाट्यप्रयोगास मोलाची साथ मिळाली ती नेपथ्याची. कपिल चारी यांनी बॅरिस्टर यांचा वाडा, समोर बगीचा आणि भाऊरावांची खोली असे वेगळे आकर्षित सेट अप्रतिमरित्या लावले होते. शिवाय प्रकाशयोजनेची जबाबदारी अतिशय सुंदरपणे साहिल बंदोडकर यांनी सांभाळून घेतली. त्यांनी प्रत्येक पात्रांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून त्यानुसार लाईटचा योग्य वापर केला. नित्यानंद पेडणेकर यांची रंगभूषा शोभून दिसली. वेशभूषाची धुरा सौ. उषा नागवेंकर ह्यांनी सांभाळली. दुसरा ह्या नाटकाचा यशस्वी भाग म्हणजे पार्शवसंगीत. सागर गावसच्या पार्शवसंगीताने सुरवात ते शेवटपर्यंत संपूर्ण नाट्यगृह मंत्रमुग्ध करून सोडले. प्रत्येक प्रसंगाला अनुसरून त्यांनी संगीताची सुरेख साथ दिली. मुळातच नाटकाची सुंदर कथा आणि त्याला लाभलेली अभिनय, संगीत आणि प्रकाश योजनेची सांगड यामुळे नाट्यरासिकांना एक दर्जेदार नाट्य प्रयोग पाहायला मिळाला. श्री गिरीश दळवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी रंगमंचावर येऊन सर्व कलाकरांचे उत्कृष्ट अभिनयबद्दल अभिनंदन आणि कौतुक केले. सृजन गोवा ह्या संस्थेमुळे कालिका थिएटर्सला, “बॅरिस्टर “नाटकाचे लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रम प्रित्यर्थ अजरामर नाटक सादर करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल थिएटर्स चे अध्यक्ष विनायक नागवेंकर आणि दिग्दर्शक व मुख्य कलाकार पुष्पशील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.